पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला   

२६ पर्यटक ठार; अनेक जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी हिंदू पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरण परिसरात पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारत त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले असून, यात बहुतेक पर्यटक आहेत. मृतांमध्ये दोन परदेशी पर्यटक आणि दोन स्थानिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांची नेमकी संख्या किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री उशीरा राजधानी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 
 
काल दुपारी तीनच्या सुमारास बैसरण परिसरातील जंगलातून काही दहशतवादी आले आणि त्यांनी एका टेकडीवरील ४० पर्यटकांच्या गटाला घेरले. त्यानंतर बेछूट गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून घाबरलेल्या आणि पर्यटनावर जीवन जगणार्‍या नागरिकांनी घटनास्थळावरुन पलायन करण्यास आणि सुरक्षित जागी जाण्यास सुरूवात केली. 
 
एका महिलेने हल्ल्याचे वर्णन करताना सांगितले की, माझ्या पतीचा मृत्यू डोक्यात गोळी लागून झाला. आम्ही केवळ मुस्लिम नाही म्हणून आमच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या हल्ल्यात अन्य काही जण जखमी झाले. या महिलेने आपले नाव सांगितले नाही. माझ्या नवर्‍याला वाचवा, अशी आर्त विनवणी ती करत होती. हल्ला झालेल्या परिसरात केवळ चालत जाणे किंवा खेचरानेच जाता येते. त्यामुळे जखमींना खेचरावर आणण्यात आले. दरम्यान, जखमींना अन्यत्र हलविण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले.अन्य एका प्रत्यक्षदर्शीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर, त्यांनी तेथून पळ काढला. हे दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते.
 
या हल्ल्यानंतर केंद्र सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये आले आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला. या हल्ल्यामागे शेजारील राष्ट्राचा हात आहे का? हे तपासले जात आहे.अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सहकुटुंब भारताच्या दौर्‍यावर आले असताना हा हल्ला झाला. व्हान्स काल राजस्तानमध्ये होते.या हल्ल्याचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पर्यटक जमिनीवर पडलेले दिसतात. काही महिला पर्यटक रडताना दिसत आहेत. तर काही प्रियजनांचा शोध घेताना दिसत आहेत.
 
अलीकडच्या काळातील सामान्यांवर झालेला हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले. पर्यटकांवरील हल्ला धक्कादायक आणि अमानुष आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीदेखील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. अशा प्रकारचा हिंसाचार अस्वीकार्य आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे, असे त्यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

नाव आणि धर्म विचारत बेछूट गोळीबार !

कौर्याचे टोक गाठत दहशतवाद्यांनी अनेक हिंदू पर्यटकांचे संसार होत्याचे नव्हते केले! पतीच्या पार्थिवाजवळ विमनस्कपणे बसलेल्या या महिलेच्या छायाचित्राने संपूर्ण देश हळहळत आहे. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची तीव्र लाट उसळली असून दहशतवाद्यांचा नंगानाच आणखी किती काळ चालणार? असा सवाल केला जात आहे. 

गृहमंत्री शहा श्रीनगरमध्ये 

या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. तसेच, शोध मोहीम हाती घेण्यात आली. वर्षानुवर्षे दहशतवादाचा सामना करणार्‍या काश्मीरमध्ये सध्या पर्यटकांनी गर्दी केली आहे. पहलगाम परिसर ’मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. पर्यटकांमध्ये घबराट आणि दहशत पसरविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच, हा हल्ला करण्यात आला, असेही ते म्हणाले. या हल्ल्याआधी पहलगाममधील रिसॉर्ट पर्यटकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. हल्ल्यानंतर पर्यटकांनी ते लगेच सोडले.  बैसरन हे पहलगाम मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येत्या ३ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. यंदा ही यात्रा ३८ दिवसांची असणार आहे. त्यासाठी नुकतीच नोंदणी सुरू झाली आहे. देशभरातून लाखो श्रद्धाळू अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात.
 

पहलगाम येथील अमरनाथ बेस कॅम्प येथे २००० मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ३० भाविक ठार झाले होते. तर, ६० जण जखमी झाले होते.

शेषनाग येथे २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यात १३ भाविक ठार झाले होते. तर, १५ जण जखमी झाले होते.

२००२ मध्ये पहलगाम येथे आणखी एका हल्ल्यात ११ जण ठार झाले होते. 

२०१७ मध्ये अमरनाथ गुहेकडे जाणार्‍या मार्गावर आठ भाविक ठार झाले होते. 

गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगामच्या यान्नार येथे राजस्तान येथील एक दाम्पत्य गोळीबारात जखमी झाले होते.

 

Related Articles